नंदूरबार l प्रतिनिधी
महामार्गावरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी नवापूर पोलिसांच्या ताब्यात 37 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,17 सप्टेंबर रोजी राहुल सिद्धार्थ कांबळे रा.रेल्वे स्टेशन जवळ, हनुमान नगर बुट्टी बोरी, नागपूर हे त्यांच्या मालकीचा आयशर ट्रक मध्ये लिफ्टचे साहित्य नागपूर येथून घेऊन सुरत येथे जाण्यासाठी निघाले होते 19 सप्टेंबर रोजी नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप समोर त्यांच्या मालकीचे आयशर वाहन थांबवून आराम करीत असताना रात्री 9.30 वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची विना क्रमांकाची व्हँगनर वाहन व त्यामध्ये बसलेले चार अनोळखी इसम यांनी राहुल कांबळे यांना व त्यांच्यासोबत असलेला वाहनाचा क्लिनर यांना वाहनाच्या खाली उतरवून मारहाण करून त्यांच्या ताब्यातील 20 लाख रुपये किमतीचे वाहन व वाहनात असलेले लिफ्टचे साहित्य जबरीने हिसकावून नेले.
म्हणून नवापूर पोलीस ठाणे येथे अज्ञात चार आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच सदर घटनेबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षक, निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्याच्या सीमे हद्दीस लागून असलेले धुळे जिल्हा व गुजरात राज्यातील तापी, डांग येथील नियंत्रण कक्षास नाकाबंदी करणेबाबत कळविले. तसेच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत सूचना दिल्या.
नवापूर पोलीस ठाण्याचे पथक महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबे, टोलनाके येथे माहिती घेत असताना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंप समोरून आयशर वाहन व त्यामध्ये असलेला माल चोरीचा गुन्हा नवापूर एमआयडीसी येथे राहणारा संदीप गावित व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून केलेला आहे.
पोलीस अधीक्ष पी. आर. पाटील यांनी सदरची माहिती नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना कळवून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले.
नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व त्यांच्या पथकाने नवापूर एमआयडीसी परिसरात राहणारा संदीप गावित यांच्या बाबत माहिती घेतली असता तो नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील करंजी गावाचे शेत शिवारात असले बाबत समजून आल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शेताच्या आजूबाजूला सापळा रचून संदीप इदालजी गावित रा.नांदवण एमआयडीसी नवापूर, ता. नवापुर याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या सोबत असलेले 3 इसम उसाचे शेतात अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमाकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच त्याच्या ताब्यातून जबरीने चोरुन घेवुन गेलेले 20 लाख रुपये किमतीचे आयशर वाहन व त्यामधील 17 लाख रुपये किमतीचे लिफ्टचे साहित्य कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलिसांच्या पथकास रोख बक्षीस जाहीर केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, मनोज पाटील, महेश फटांगरे, पोलीस हवालदार नितीन नाईक, दादाभाऊ वाघ, दीपक पाटील यांच्या पथकाने केलेली आहे.








