नंदूरबार l प्रतिनिधी
मोलगीचा (चनवाईपाडा)) येथे अल्पवयीन युवतीवर अत्याचार करुन तिला जीवे ठार मारण्यात आले या प्रकरणात योग्य तपास होऊन इतर आरोपींना अटक केली जात नसल्याच्या निषेधार्थ दि.27 सप्टेंबर रोजी अक्कलकुवा येथे पोलीस उप अधिक्षक कार्यालया समोर विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अंकलेश्वर बऱ्हाणपूर महा मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या बाबत मुलीच्या आईने पोलीस उप अधिक्षक सदाशिव वाघमारे यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अत्याचाराच्या घटनेत एकूण सात आरोपी असतांना आतापर्यंत पोलिसांनी फक्त तीन आरोपींना अटक केली आहे सात पैकी उर्वरित चार आरोपी यांना अजुन पावेतो अटक करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे मयत युवतीवर दि.13 जुलै 2023 रोजी लैंगिक अत्याचार करुन गळफास लावुन तिला टांगून दिले. मयत युवतीचे मामा हे पाण्याची मोटर घेण्यासाठी गेले असता घरात युवतीच्या नावाने आवाज दिला मात्र दरवाजा उघडला नाही म्हणुन दरवाजा उघडुन घरात जाताच मयत युवतीचा मृतदेह टांगलेला अवस्थेत दिसून आला
15 ते 17 जुलै दरम्यान मोलगी पोलीस स्टेशनचे अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे मयत युवती वर अत्याचार करुन तिचा खुन केल्याच्या वारंवार तक्रारी करुन देखील संबंधितांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष करुन पद्धतशीरपणे गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,आम्हाला न्याय मिळावा म्हणुन आम्ही विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांची भेट घेऊन त्यांना सदर घटनेची सविस्तर माहिती व आमच्याकडे उपलब्ध झालेले पुरावे दिले. त्या अनुषंगाने आ.आमश्या पाडवी यांनी दि. 19 जुलै 2023 रोजी विधान परिषदेत आवाज उठवुन सभागृहाचे व सरकारचे लक्ष वेधले त्यामुळे दि.20 जुलै रोजी मोलगी ठाण्यात या संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्यातही खुनाचा गुन्हा दाखल न करता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा नाममात्र गुन्हा नोंदविण्यात आला.
मयत युवतीच्या खुनाप्रकरणी सुरुवातीपासूनच या गुन्ह्यातील आरोपींना वाचविण्यासाठी व गुन्ह्याला रफादफा करण्यासाठी मोलगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, मोलगी पोलीस ठाण्याचे तत्कालीन अधिकारी व विद्यमान अधिकारी, पोलीस कर्मचारी हे संबंधित खुनाच्या आरोपींना या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. असा गंभीर गुन्हा घडला तरी प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी न्यायाची बाजू न घेता अन्यायाला साथ देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
म्हणुन उर्वरित चार आरोपींना अटक व्हावी तसेच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी या सर्वांची सखोल चौकशी करुन कठोर दंडात्मक कारवाई व्हावी या करिता दि. 27 रोजी अंकलेश्वर बऱ्हाणपूर महा मार्गावर पोलीस उप अधिक्षक कार्यालया समोर आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळे पर्यंत रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा पीडित युवतीच्या आईने शेवटी निवेदनात दिला आहे.