नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार हुन पुण्याकरीता स्वतंत्र रेल्वे सुरु करावी अशी महत्वपुर्ण मागणी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
धुळे जिल्हयातील शिंदखेडा येथे विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील हे आले असता भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी ना.रावसाहेब दानवे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एका निवदेनाव्दारे वरील मागणी केली.
या निवदेनात म्हटले आहे की, नंदुरबार हुन हजारो विदयार्थी, नागरीक व व्यापारी वेगवेगळया कारणांसाठी पुणे ये-जा करीत असतात. नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धडगांव व नवापुर येथुन रोज किमान 10 लक्झरी बस भरुन हजारो प्रवासी पुण्याला जातात व तितकेच प्रवासी पुण्याहुन नंदुरबार ला येत असतात.
खाजगी लक्झरी बसने प्रवास करतांना प्रवाश्यांना मोठया प्रमाणात पैसे देखील मोजावे लागतात व जीवघेणा प्रवास देखील करावा लागतो. ही बाब लक्षात घेता अनेक वर्षापासुन नंदुरबार – पुणे स्वतंत्र रेल्वे गाडी सुरु करावी ही मागणी सातत्याने होत आहे. तस पाहिले तर रेल्वे प्रशासनाला आर्थीक लाभ देखील होणार आहे. त्यामुळे नंदुरबार – पुणे रेल्वे सुरु करुन नवजीवन एक्सप्रेसची पुर्वीचीच वेळ करावी अशी देखील मागणी या भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केली.








