नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा ज्युदो असोसिएशन व इंडीयन ऍडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने नवापूर येथील सार्वजनिक गुजराती हायस्कुल येथे तीन दिवसीय ज्युदो प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या महीला स्वसंरक्षण प्रशिक्षणात ५०० हून अधिक मुलींनी सहभाग घेतला. शिबिरात मुलींना सेल्फ डिफेन्सचे नवनवीन प्रकार शिकविण्यात आले. प्रात्येक्षिके देखील करून दाखविण्यात आली.
सार्वजनिक गुजराती हायस्कूलचे प्राचार्य संजय जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख, पर्यवेक्षक फारुख पटेल, नवापूर तालुका प्रशिक्षिका ज्योती चौधरी, संतोष मराठे, गणेश मराठे, कल्पेश तडवी, अशोक बहिरम, सिद्धेश्वर चौधरी आदी उपस्थित होते. गणेश मराठे यांनी सांगितले की, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आजच्या युगात महिलांनी पुरुषापेक्षा सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण महिलांवर होणारे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठी प्रत्येक युवतींनी ज्युदो कराटे सारखे खेळ आत्मसात करण्याचा संकल्प केला पाहिजे.
ज्योती चौधरी म्हणाल्या की, सोशल मीडिया सारख्या साधनाचा वापर जास्त प्रमाणात करू नये, महिलांनी घराबाहेर पडताना दागिन्यांची काळजी घ्यावी. नेहमी सतर्क राहावे, जर वाईट वेळ आली तर ताबडतोब दुश्मनशी दोन हात केले पाहिजेत. शिबिरात गुजराती हायस्कूल व ज्यु.कॉलेज आणि उर्दु हायस्कूल मिळून जवळपास ५०० पेक्षा अधिक मुलींनी सहभाग घेऊन नवापूर तालुक्यात मोठा विक्रम प्रस्थापित केला. सदर प्रशिक्षण शिबिराचे ट्रेनिंग कोच म्हणून ज्योती चौधरी, संतोष मराठे, गणेश मराठे व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.