नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील नांदरखेडा ते भिलाई गावादरम्यान ट्रॉलाने बसला धडक दिल्याने चालकासह प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी ट्रॉला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार बस आगारातील चालक संदिप सुरेश चौधरी हे त्यांच्या ताब्यातील बस (क्र.एम.एच. ०६ एस ८६१५) नांदरखेडा ते भिलाई गावाच्या रस्त्याने जात होते. यावेळी रामसिंग ताराचंद गुजर (ता.नशिराबाद अजमेर, राजस्थान) याने त्याच्या ताब्यातील २२ चाकी ट्रॉला (क्र.आर.जे.०१ जीबी ५२२३) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून समोरुन येणाऱ्या एस.टी. बसला साईडने धडक दिली. या अपघातात चालक संदिप चौधरी यांच्यासह बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
तसेच वाहनाचेही नुकसान झाले. याबाबत संदिप चौधरी यांच्या फिर्यादीवरुन ट्रॉला चालक रामसिंग ताराचंद गुजर याच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम २७९, ३३७, ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.विनायक सोनवणे करीत आहेत.








