नंदूरबार l प्रतिनिधी
‘पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याने पर्यावरणाचा -हास होऊ नये व निसर्गाचे संरक्षण व्हावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यातील पहिला टप्पा म्हणून जिल्हा पोलीस दलाने उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील भांगडा गावाचे शिवारात वन विभागाच्या क्षेत्रावर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करुन वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 25 हजार वृक्ष लागवड करुन वृक्षारोपणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे लावण्यात येणारी 1 लाख रोपे नंदुरबार वन विभागाकडून उपलब्ध करुन घेण्यात येणार असून त्यांच्या लागवडीचे योग्य प्रकारे नियोजन व आखणी केली आहे. तसेच येत्या काही दिवसात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील इतर पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय तसेच जिल्ह्यातील शाळा / महाविद्यालयीन आवार, शासकीय पडीक जागा व इतर ठिकाणी 75 हजार वृक्षारोपण करुन 1 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या वृक्षलागवडीमुळे नागरीकांनी याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या 1 लाख वृक्षारोपण कार्याक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देवून सहभाग नोंदवावा असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी केले.वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त भांगडा गावाचे शिवारात वन विभागामार्फत उभारलेल्या वॉच टॉवरचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे वेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार चारुदत्त शिंदे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, नवापूर वन क्षेत्रपाल श्रीमती स्नेहल अवसरमोल, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय बसावे, पोलोस उप निरीक्षक जगन वळवी, प्रविण कोळी, अनिल गोसावी, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तसेच जिजामाता माध्यमिक विद्यालय नंदुरबार येथील शिक्षक व विद्यार्थी, भांगडा गावाचे सरपंच, वसलाई, वेळावद, देवपूर नटावद, पिंपळोद, वेडापावला, उमज गावाचे पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.








