नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित अलहाज काझी चिरागोद्दीन प्राथमिक, अँग्लो उर्दु माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेजमध्ये मागील 12 ते 15 वर्षात बेकायदेशीर झालेल्या भरती प्रक्रियेतील नेमणुकांची सखोल चौकशी करुन दोषी आढळणार्यांवर तात्काळ गुन्हे नोंदवून कारवाई करण्याची मागणी विविध संस्था व संघटनाच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
याबाबत नंदुरबार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार शहरात नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित अलहाज काझी चिरागोद्दीन प्राथमिक, अँग्लो उर्दु माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेज आहे. या संस्थेच्या शाळेत गेल्या 12 ते 15 वर्षापासून बेकायदेशीर झालेल्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांची मुलाखत न घेता व परस्पर गुणवत्ता नसलेल्या उमेदवारांची परस्पर भरती करण्याचा प्रकार सुरु आहे.
मागील तीन महिन्यात दोन शिक्षकांची भरती करण्यात आली. या परस्पर होणार्या भरती प्रक्रियेने गुणवत्ताधारक उमेदवार वंचित राहत आहेत. नॅशनल एज्युकेशन सोसायटी संस्थेचे 2008 पासून कोणतेही विश्वस्त मंडळ अस्तित्वात नाही. त्यामुळे सदर संस्थेत तथाकथित कार्यकारी मंडळाकडून काम करण्यात येत आहे. तसेच विविध पदांवरील भरती ही गुणवत्तेवर आधारित होत नसल्याने बेकायदेशीरपणे भरती प्रक्रिया राबविली जात असल्याचे निदर्शनास येते. म्हणुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करुन तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष जाकीर जहागीदार, नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान, शकील शेख, काँग्रेस अल्पसंख्यांक शहर विभाग अध्यक्ष असलम पिंजारी, अब्दुल नासिर मनियार आदींनी निवेदनातून केली आहे.








