नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहांची झालेली प्रचंड दुरावस्था व शाळेत निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. म्हणुन आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहांची त्वरीत दुरुस्ती करुन साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम नुरला पावरा यांनी केली आहे.
याबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यातील दुसर्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा सुरु आहे. या आंतरराष्ट्रीय शाळेत दुर्गम व अतिदुर्गम भागातील 1600 हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु सदर आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा असलेल्या तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या स्वच्छतागृहातील शौचालयांची पाईप लाईन तुंबल्याने शाळेमधील स्वच्छतागृह हे अस्वच्छतेने पुर्णतः खराब झालेले आहे.
स्वच्छतागृहातील दरवाजे तुटलेले आहेत. शौचालयासाठी असलेले स्वच्छतागृह हे घाणीने तुंबलेले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरील परिसरात शौचालयासाठी जावे लागत असून शाळेतील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. परंतु याच आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असलेली स्वच्छतागृहांची दयनिय अवस्था झाली आहे.
अगोदरच आंतरराष्ट्रीय शाळेतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळत नाही. त्यातच आता आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था झालेली असल्याने शाळेत दुर्गंधी पसरली असून घाणीचेही साम्राज्य निर्माण झाले आहे. शाळेसह परिसरातही अस्वच्छतेचा अभाव दिसून येत असून घाणीच्या साम्राज्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित प्रशासन व शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
याकडे आपल्या स्तरावरुन लक्ष देवुन तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय शाळेतील दुरावस्था व तुंबलेल्या स्वच्छतागृहांची त्वरीत दुरुस्ती करावी. तसेच शाळेसह परिसराची स्वच्छता करुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणुन परिसरात औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम नुरला पावरा, मलगावचे सरपंच अमित पाडवी, चाँदसैलीचे सरपंच प्रशांत पटले यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनाची दखल घेत नंदुरबार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी लागलीच कार्यवाहीचे आदेश दिले.








