नंदुरबार l प्रतिनिधी
शेतीचे खातेफोड करून तीन्ही भावांचे नावाने सातबारा तयार करून देण्याच्या १५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी रोजगाव ता.साक्री, जि.धुळे येथील महिला तलाठ्यासह तिघांविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साक्री तालुक्यातील जैताणे (ह.मु.तळोदा) येथील तक्रारदार यांचे रोजगाव शिवारात शेत असून या शेतीची खातेफोड करुन तिन्ही भावांच्या नावाने सातबारा तयार करुन देण्याच्या मोबदल्यात एकूण ४० हजार रुपये लाचेची मागणी रोजगाव येथील तलाठी ज्योती के.पवार यांनी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये व मार्च २०२३ मध्ये तक्रारदारांच्या वडीलांकडून १० हजार रुपये असे एकूण २० हजार रुपये काम करुन देण्याच्या मोबदल्यात घेतले होते.
दरम्यान, तक्रारदारांनी १८ एप्रिल २०२३ रोजी नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली होती. त्यानुसार पंच साक्षीदारांसमक्ष पडताळणी केली असता तलाठी ज्योती पवार यांनी खातेफोड करुन देण्याच्या मोबदल्यात उर्वरीत २० हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
त्यानंतर त्याच दिवशी तक्रारदार हे तलाठी श्रीमती पवार यांना लाचेची रक्कम देण्यास गेले असता त्या आढळल्या नाहीत. परंतू कार्यालयातील संगणक ऑपरेटर योगेश सावळे यांनी तक्रारदारांना पैसे आणलेत का? असे विचारुन लाचेची मागणी केली. तसेच २९ मे रोजी सापळा कारवाईदरम्यान संगणक ऑपरेटर योगेश सावळे व जैताणे येथील कोतवाल छोटू जाधव यांनी तलाठी ज्योती पवार यांच्या सांगण्यावरुन तक्रारदारांच्या राहत्या घरी जाऊन पुन्हा पंच साक्षीदारांसमक्ष लाचेची मागणी केली.
याप्रकरणी काल तिघांविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई नंदुरबार येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक समाधान वाघ, सह सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक माधवी वाघ यांच्यासह पोहेकॉ.विजय ठाकरे, ज्योती पाटील, पोना.मनोज अहिरे, देवराम गावित, पोना.संदीप नावाडेकर व पोना.अमोल मराठे यांच्या पथकाने केली आहे.








