नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव (अक्राणी) तालुक्यातील नवनिर्मित झालेल्या 47 ग्रामपंचायतींना एल.जी.डी. कोड न मिळाल्याने 15 वित्त आयोगाचा निधी विकास कामांसाठी खर्च करण्यास अडचणी येत असून विकास कामेही रखडली आहेत.
म्हणुन धडगाव तालुक्यातील तोरणमाळ भागातील नवनिर्मित 47 ग्रामपंचायतींना 15 वा वित्त आयोग अंतर्गत विकास कामांसाठी मंजूर झालेला व मिळालेला निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींना आवश्यक असलेला एल.जी.डी.कोड (क्रमांक) देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती गणेश पराडके, खडकीचे सरपंच सिताराम नुरला पावरा, झापीच्या सरपंचा गिता भारसिंग पावरा, सिंधीदिगरच्या सरपंचा सोमाबाई संदिप पावरा यांनी केली आहे.
याबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाने मागील वर्षी नोव्हेंबर- डिसेंबर 2022 मध्ये धडगांव (अक्राणी) तालुक्यातील तोरणमाळ भाग, मांडवी भाग, भुषा भाग, रोषमाळ भाग या भागातील तीन ग्रामपंचायतींचे विभाजन करुन नव्याने 47 ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली. या 47 ग्रामपंचायतींची निर्मिती होवून तब्बल सात महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे.
या नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकाही पार पडून सात महिने झाले. सदर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विकास कामांसाठी प्रस्ताव व आराखडा सादर करण्यात आल्याने राज्य शासन व नंदुरबार जिल्हा परिषद आणि धडगांव पंचायत समितीच्या माध्यमातून 15 वा वित्त आयोगाचा निधी नवनिर्मित 47 ग्रामपंचायतींना मंजूर होवून मिळाला आहे. परंतू हा निधी विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींकरीता आवश्यक असलेला एल.जी.डी. कोड (क्रमांक) अद्यापपर्यंत नवीन ग्रामपंचायतींना मिळालेला नाही.
यात तोरणमाळ भागातील खडकी, झापी, फलाई, सिंधीदिगर, कुंड्या, भादल, केलापाणी, भाबरी, उडद्या, भमाणे, सावर्यादिगर, बिलगाव, त्रिशूल, चिखलीबरी, माळ, शेलगदा, गेंदा अशा एकूण 47 नवीन ग्रामपंचायतींना महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एल.जी.डी. कोड (क्रमांक) मिळालेला नसल्याने सदर ग्रामपंचायतींतर्गत येणारी गावे विकास कामांपासून वंचित आहेत. तसेच विकास कामांसाठी मिळालेला निधी मंजूर होवून ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात पडून असल्याने त्याचा काहीही उपयोग होत नाही. आठ महिन्यांपूर्वी निवडणूकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांना विकास कामे होत नसल्याबाबत नागरीकांकडून विचार होत असल्याने उत्तरे द्यावी लागत आहेत.
म्हणून धडगाव तालुक्यातील तोरणमाळ भागातील नवनिर्मित 47 ग्रामपंचायतींना 15 वा वित्त आयोग अंतर्गत विकास कामांसाठी मंजूर झालेला व मिळालेला निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींना आवश्यक असलेला एल.जी.डी.कोड (क्रमांक) त्वरीत देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती गणेश पराडके, खडकी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम नुरला पावरा, झापी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंचा गिता भारसिंग पावरा, सिंधीदिगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचा सोमाबाई संदिप पावरा यांनी निवेदनातून केली आहे.








