नंदूरबार l प्रतिनिधी
खासदार डॉ. हिना गावित आयोजन समितीद्वारे बुधवारी सकाळी आयोजित येथील मॅरेथॉन स्पर्धेत ३०० मुलामुलींनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत पुरुष गटात दिनेश वसावे तर महिला गटात आरती पावरा यांनी विजेतेपद पटकावले. त्यांच्यासह सर्व विजयी खेळाडूंना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. कुमुदिनी गावित, खा. डॉ. हिना गावित व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.


खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त चार विविध गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता ८ वी ते १० वीच्या मुलांसाठी घेतलेल्या ५ कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेत कुलदीप मंगलदास वसावे, अनु. मध्यमिक आश्रम शाळा जळके, शशिकांत धनंजय गावित, आदिवासी आश्रम शाळा, निजामपूर व चेतन भाऊसाहेब धनगर हस्ती पब्लिक स्कूल, दोंडाईचा यांनी अनुक्रमे एक ते तीन आले.
क्रमांक पटकावले. याच गटातील मुलींसाठी झालेल्या ५ कि.मी. स्पर्धेत शाकिला बाषा वसावे, एच. आर. पटेल माध्यमिक विद्यालय, शिरपूर, राणी राजाराम चौरे व निर्मला पोपट गावित, शासकीय माध्यमिक विद्यालय वार्सा यांनी एक ते तीन क्रमांक पटकावले. वरिष्ठ पुरुषांसाठी झालेल्या १० कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेत दिनेश सजन वसावे, चांदसैली, जगन्नाथ उलूशा पवार, पिंपळनेर व सोमनाथ भगवानसिंग पावरा, शिरपूर यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. तर महिलांसाठी झालेल्या ५ कि.मी. स्पर्धेत आरती अर्जुन पावरा, धुळे, शेवंता तुळशीराम पावरा, शिरपूर व सविता तुकाराम गावित, पिंपळगाव हे खेळाडू पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले. स्पर्धेत प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपयांचे रोख बक्षिस देण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेमुळे शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले.
दरम्यान नंदुरबार येथील खा डॉ हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभ पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित, जि. प.अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित, खा डॉ हिना गावित यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला होता.








