नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील काथर्दे खुर्द येथील दीड वर्षाच्या बालकाने जागतिक विक्रम केला आहे. कमीत कमी वेळेत अधिकाधिक मानवी अवयव ओळखण्याचा त्याने विक्रम केला असून त्याचे वय एक वर्ष पाच महिने आहे. त्याच्या या यशाची नोंद वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याचे कौतुक करत सत्कार केला.
काथर्दे खुर्द येथील रहिवासी असलेले आणि सध्या भुसावळ येथील नहाटा महाविद्यालयाचे डॉ.विलास महिरे आणि प्रज्ञा पवार महिरे यांचा मुलगा त्रिकय याने हे यश मिळवले. एक वर्ष पाच महिने असे त्याचे वय आहे. एक मिनिट ३७ सेकंदात त्याने अधिकाधिक मानवी अवयव ओळखण्याचा विक्रम केला.
त्याच्या विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. नंदुरबार तालुका विधायक समितीच्या धानोरा येथील समता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य अशोक पवार आणि नाना महीरे यांचा नातू आहे. त्रिकयने मिळवलेल्या यशाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र देण्यात आले आणि त्याचा गौरव करत कौतुक करण्यात आले.








