नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिवलउतार येथे आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील धजापाणी येथील विनोद आजोऱ्या पावरा यांची पत्नी दिपाली विनोद पावरा ही नांदायला येत नाही. तसेच त्याची मुलगी खुशीला पाठवित नाही. या कारणारुन विनोद पावरा व दीपाली पावरा यांच्यात वेळोवेळी भांडण होत होते. तसेच विज्या जुन्या वसावे, भरत विज्या वसावे व किरण विज्या वसावे यांनी विनोद पावरा यांना हाताबुक्यांनी मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
विनोद पावरा यांना मानसिक त्रास दिल्याने त्यांनी चिवलउतार येथील उदय नदीच्या काठी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत आजोऱ्या रेल्या पावरा यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील भरत विज्या वसावे व किरण विज्या वसावे यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज निळे करीत आहेत.








