नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नंदूरबार सह
तळोदा, रनाळा व शहादा येथे आषाढी एकादशीमुळे बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा मोहल्ला कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, 29 जुन रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील कुरेशी मोहल्ला येथे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोहल्ला कमिटीची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मोहल्ला कमिटीच्या बैठकीस उपस्थित सर्व सदस्यांना समाजातील सर्व नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक शांतताप्रिय असून, सर्वसामान्य नागरिकांना शांतता हवी आहे. गेल्या काही दिवसात नंदुरबार जिल्ह्यात शांतता टिकवून ठेवण्यात सर्व सामाजिक घटकांनी हातभार लावला आहे. तसेच आपली जबाबदारी ओळखून नागरिक पोलीसांना सहकार्य करीत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरा करावा.
काही तक्रारी अडचणी असतील तर आपल्या हद्दीतील पोलीस अधिकारी किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा तसेच एकमेकांच्या भावनांचा आदर करीत सण व उत्सव साजरे केल्यास सामाजिक एकोपा टिकून राहील असेही यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले,
यंदा बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचे आवाहन मोहल्ला कमिटीच्या बैठकीत केले, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत हिंदू धर्मीय बांधवांच्या भावनांचा आदर राखत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय बैठकीतील सदस्यांनी जाहीर केला.
त्याबद्दल त्यांचे पोलीस दलाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. मोहल्ला कमिटीच्या सदस्यांनी अशाप्रकारे एकमुखाने आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल पोलीस अधीक्षकांनी समाधान व्यक्त केले. तसेच तळोदा, रनाळा व शहादा येथील बैठकीत सुध्दा आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे एक चांगला सामाजिक संदेश समाजात जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोहल्ला कमिटीच्या या बैठकीत कुरेशी समाजाच्या वतीने पप्पु कुरेशी, हाजी यूनुस, अबिद पहेलवान, जाकीर कुरेशी यांनी पुढाकार घेवून आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पोलीसांच्या आवाहनाला मुस्लिम समाजाचा पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकी दरम्यान पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचेसह शांतता समितीचे सदस्य राजु इमानदार, डॉ. जमील शेख, मौलाना अब्दुल हाफीज, निबा माळी, मानीक माळी, श्रीमती मालती वळवी, तौसीफ शेख व मोहल्ला कमिटीच्या बैठकीस पप्पु कुरैशी, हाजी यूनुस, अबिद पहेलवान, जाकीर कुरैशी आदी सदस्य उपस्थित होते.
29 जुन रोजी साजरा होणारा बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण उत्साहाने साजरे करतांना कायद्याचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी सर्व घटकांनी आगामी सण उत्सवाच्या काळात सक्रियपणे मदत करावी व सामाजिक सलोखा राखावा.
पी. आर. पाटील
पोलीस अधीक्षक, नंदुरबार








