नंदुरबार l प्रतिनिधी
अण्णासाहेब विकास मंडळ कार्यालय नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करावे. तसेच नंदुरबार तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकर्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे दि.१५ जून रोजी नंदुरबार जिल्हा दौर्यावर असता त्यांची भेट घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव आहेत व त्यात बेरोजगार आर्थिक दुर्बल देखील आहेत. आपल्या मार्फत अण्णा साहेब विकास महामंडळाला आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला.
परंतू जिल्ह्याच्या ठिकाणी मंडळाचे कार्यालय नाही. सदर मंडळाच्या योजनांपासून जिल्ह्यातील मराठा समाज बांधव हे वंचित राहिले आहेत. तरी सदर कार्यालय नंदुरबार जिल्हाच्या ठिकाणी सुरु करावे.
नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. गुरे, ढोरे, बकरी असे असंख्य जनावरे दगावले होते, त्याची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील २ मंडळाची आणेवारी ही ५० पेसेच्या आत आहे. तरी या भागातील कोरड्या दुष्काळाची मदत अजून मिळालेली नाही. तसेच चालू वर्षी पिक कर्जासाठी शेतकरी बांधवांना बँकेकडून पाहिजे तसे सहकार्य व कर्ज मिळत नाही. मागील वर्षी देखील शासनाने दिलेल्या उद्दीष्टेपेक्षा ५० टक्केपेक्षा जास्त शेतकर्यांना कर्ज मिळाले नाही. तशीच परिस्थिती यावर्षी देखील दिसत आहे. तरी आपण आपल्या स्तरावर जिल्ह्यातील शेतकरी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, नंदुरबार तालुकाध्यक्ष बबलू कदमबांडे, उपाध्यक्ष राहुल जगदेव, डॉ.जगदिश चौधरी आदी उपस्थित होते.








