नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयाचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 मध्ये वर्गीकरण झोन-3 मधून झोन-1 मध्ये समाविष्ट करण्याची मागणी मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यांच्या द्वारे शासन निर्णय क्र. धोरण 2023/प्र.क्र.81 टेक्स-5 महाराष्ट्राचे “एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28” हे दि.2 जून 2023 रोजी मंजूर झाले आहे.
सदर वस्त्र उद्योग धोरणात जिल्हयाचे झोन निहाय वर्गीकरण करण्यात आलेले आहे. नंदुरबार जिल्हा हा झोन क्र. 3 या वर्गीकरणात नाशिक व अहमदनगर जिल्हया सोबत जोडण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या सामूहिक प्रोत्साहन योजना 2019 अंतर्गत नंदुरबार हा जिल्हा अति अविकसित व आकांक्षीत जिल्हा (Aspirational District) म्हणून प्रोत्साहनास पात्र आहे. त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या नीती आयोगाद्वारे नंदुरबार जिल्हा ‘आकांक्षित’ जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हयाचा औद्योगिक विकास होणे व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे अतिआवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असुन नंदुरबार जिल्हयातील नवापूर तालुक्यात गुजरात राज्यातील सुरत जिल्हयातील वस्त्र उद्योजक मोठया प्रमाणात उद्योग स्थापीत आहेत.
वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत नंदुरबार जिल्हयाचे वर्गीकरण झोन-3 मध्ये समाविष्ठ केल्यामुळे नंदुरबार जिल्हयात वस्त्र उद्योग स्थापन करणाऱ्यांना आता कमी प्रमाणात प्रोत्साहन प्राप्त होणार आहे. सबब नवीन वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम या जिल्हयाचा समावेश झोन 1 मध्ये करण्यात आलेला आहे. उद्योग विभागाच्या चंद्रपूर, गडचिरोली व वाशिम हे जिल्हे सामूहिक प्रोत्साहन योजना 2019 अंतर्गत आकांक्षीत जिल्हयात समाविष्ठ होतात.
वस्त्र उद्योग धोरणात 2023-28 अंतर्गत नंदुरबार जिल्हयाचे वर्गीकरण झोन-3 मध्ये केल्यामुळे नंदुरबार जिल्हयाचा औद्योगिक विकासात मोठा अडथळा निर्माण होऊन पर्यायाने येथील आदिवासी युवकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. नंदुरबार जिल्हयाची तुलना अहमदनगर व नाशिक जिल्हयासोबत करणे असंयुक्तीक आहे.
शेजारील गुजरात राज्यातील वस्त्र उद्योग नंदुरबार जिल्हयात आकर्षित करण्यासाठी नंदुरबार जिल्हयाचे वस्त्र उद्योग धोरण 2023-28 अंतर्गत झोन-1 मध्ये समाविष्ठ करणे अत्यावश्यक आहे. सदर बदल केल्याने नंदुरबार जिल्हा हा वस्त्र उद्योग क्षेत्रात मोठया प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक निर्माण करुन रोजगाराच्या मोठया संधी उपलब्ध करुन देण्यास सहाय्यक ठरेल. वरील बाबींचा विचार करुन नंदुरबार जिल्हयाचे एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरण 2023-28 मध्ये वर्गीकरण झोन-3 मधून झोन-1 मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.








