नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील अक्राळे येथे अवैध गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून एक लोखंडी पिस्टल व चार काडतूस हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.11 जुन रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अक्राळे गावात राहणारा दिलीप चव्हाण या इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्तुल असून तो ते पिस्टल कब्जात बाळगून फिरत असतो, अशी माहिती दिली. सदरची माहीती त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना तात्काळ नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आक्राळे गावातील संशयीत इसमाची माहिती काढून त्यास ताब्यात घेणेसाठी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत इसम दिलीप चव्हाणची माहिती काढून त्याच्या राहत्या घराच्या आजू-बाजूला साध्या वेषात सापळा रचून दिलीप गोपा चव्हाण रा. अक्राळे ता.जि. नंदुरबार यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 35 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व व 4 हजार रुपये किमतीचे 4 जिवंत काडतूस मिळून आल्याने त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने गावटी बनावटीचे पिस्टल आणले कोठुन ? याबाबत माहिती घेण्यात येत आहे. तसेच सदर गुन्ह्यात सहभाग असणान्यांची गय केली जाणार नाही असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार दिपक अमलदार शोएब शेख, किरण मोरे, विजय ढिवरे यांनी केली आहे.








