नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यासह जिल्हयात रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असून याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत आहेत.या बोगस कामांची चौकशी करण्याची संतप्त मागणी जिल्हा परिषद सदस्य यांनी स्थायी समितीच्या सभेत केली.
नंदूरबार जि.प. स्थायी सभा याहामोगी सभागृहात जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक,सभापती गणेश पराडके,संगीता गावीत, शंकर पाडवी, हेमलता शितोळे,अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह स्थायी सदस्य व विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्थायी सभेत जिल्हा परिषद सदस्य राया मावची यांनी नवापूर तालुक्यात मेहंदी पाडा सह विविध बांधकाम विभागामार्फत होत असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत बोगस कामे होत आहेत.याबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या असून यावर कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी इतर सदस्यांनीही अनेक कामे बोगस होत असल्याचे सांगितले.तसेच राया मावची, रतन पाडवी,सी.के.पाडवी, विजय पराडके यांनी अनेक वर्षापासून कर्मचारी एकच ठिकाणी नोकरी करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले.यावेळी मागील मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नसल्याचे सांगत कधी चौकश्या करणार असा संतप्त सवाल सदस्यांनी केला.








