नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर येथे अवैध दारू तस्करांवर कारवाईसाठी आलेल्या मुंबई येथील भरारी पथकावर दारू तस्करांचा हल्ला करीत पथकाच्या इनोव्हा गाडीला स्कार्पिओ ने धडक देऊन कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, नवापूर शहरातील एमआयडीसी परिसरात दमन बनावटीची दारू गुजरातमध्ये तस्करी करण्यासाठी एका ठिकाणी साठवून ठेवल्याची माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाल्यानंतर पथकाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता रात्री एक वाजता सुमारास या पथकावर दहा ते बारा जणांच्या गटाने दगडफेक केली तर वैभव गावित याने पथकातील अधिकारी यांच्या इनोव्हा गाडीवर स्कार्पिओ गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अवैध दारू तस्करांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून वैभव गावित यांच्यासह इतर दहा ते बारा जणांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नंदुरबार जिल्हा हा गुजरातचा सीमा वरती भागात असल्याने सीमा वरती भागातील नवापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात दारूची तस्करी केली जात असते या दारू तस्करीला आशीर्वाद कुणाचा असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपींच्या शोधासाठी तपास पथके पाठवण्यात आले अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली आहे.








