म्हसावद l प्रतिनिधी
सामाजिक उत्थानासाठी विविध क्षेत्रातून आयुष्यभर सेवा देणाऱ्या निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व आजच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून जामली ता. अक्कलकुवा येथे गाव सेवा समितीतर्फे सत्कार समारंभ घेण्यात आला.
सातपुड्यातील सर्वाधिक नोकरदार तथा शिक्षीतांचे गाव म्हणून ओळख असलेल्या जामली गावात अनेक अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाले. त्यांनी आयुष्यभर दिलेली सेवेचा गाव बांधवांकडूनच गौरव होणे महत्त्वाचे असते. शिवाय त्यांच्या सेवाकार्यातून आजच्या विद्यार्थ्यांना ध्येयाकडे वाटचाल करण्यास प्रेरणादायी उपक्रम घेता यावे म्हणून जामलीत गाव सेवा समिती स्थापन करण्यात आली. या समितीमार्फत हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक पारशी तडवी होते. यावेळी महसूल, शिक्षण, कृषी, बॅंक यासह नर्मदा विकास विभाग व परिवहन महामंडळातून सेवा निवृत्त झालेल्या १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान पी.टी.तडवी, आत्माबाई तडवी, रिताबाई पाडवी दिलवरसिंग तडवी, बिंद्राबाई तडवी या सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करीत उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमासाठी सुरेश तडवी, किरसिंग पाडवी, आपसिंग तडवी, रामसिंग तडवी, तापसिंग तडवी, ललित तडवी व दीपक तडवी यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्राथमिक मुख्याध्यापक विलास तडवी यांनी केले तर आभार माध्यमिक शिक्षक दिलीप पाडवी यांनी मानले.
सत्कारमूर्तींमध्ये तिघे अधिकारी
सातपुड्यातील अनेक गावांना आदर्श ठरणाऱ्या गावाच्या विकासात प्रामुख्याने निवृत्त नायब तहसीलदार के.बी.तडवी यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या पाठोपाठ निवृत्त नायब तहसीलदारच आर.डी.तडवी व निवृत्त जिल्हा सांख्यिकी अधिकारी आर.बी.पाडवी यांनीही गावासाठी महत्वाची भूमिका बजावली. या कार्यासह त्यांनी निभावलेल्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे कौतुक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
दिवंगत निवृत्तांचाही मरणोत्तर गौरव
प्रशासकीय सेवेतून निवृत्त परंतु हयात नसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही मरणोत्तर का असेना गौरव होणे आवश्यक होते. त्यानुसार त्यांच्या सेवा कार्याला अप्रत्यक्ष बळ देणाऱ्या त्यांच्याच धर्मपत्नींचा सत्कार करण्यात आला. त्यात कै.बी.एन.पाडवी यांच्या पत्नी वसुबाई पाडवी, कै. करणसिंग तडवी यांच्या पत्नी इंदिराबाई तडवी व कै. गुलाबसिंग तडवी यांच्या पत्नी सविताबाई तडवी यांचा समावेश होता.








