नंदुरबार l प्रतिनिधी
रब्बी हंगाम 2022-2023 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य (मका व ज्वारी) खरेदीसाठी NEML पोर्टलवर ऑनलाईन (Online) नोंदणीसाठीची 20 मे 2023 पर्यंत मुदत होती. परंतु नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता, राज्यातील भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची नोंदणी ही अल्प प्रमाणात झालेली आहे.
त्यामुळे अभिकर्ता संस्थांनी केलेल्या मागणीनुसार रब्बी पणन हंगाम 2022-23 मध्ये भरडधान्य (मका/ ज्वारी) खरेदीसाठी शेकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी दि. 31 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे जिल्हा पणन अधिकारी धुळे /नंदुरबार एस.बी. सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकानुसार कळविले आहे.
शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, रब्बी हंगाम 2022-23 मधील ऑनलाईन पिकपेरा नमुद असलेला 7/12 उताऱ्याची मुळप्रत, आधारकार्ड झेरॉक्स, बँक खाते पासबुकाच्या प्रथम पानांची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदि माहितीसह संबंधीत तालुक्याच्या सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या ठिकाणी नोंदणी करावी. जॉइंट खात्याचा वापर फक्त प्रथम खातेदार व्यक्तीनेच करावा. जॉईंट खात्यातील क्रमांक 02 नंबर खातेदाराने नोंदणीसाठी अकाउंट तपशिल दिल्यास PFMS पोर्टलवरुन रक्कम येणार आहे याची संबंधित खातेदाराने नोंद घ्यावी.
शेतकऱ्यांना खरेदीसाठी नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर एस.एम.एस. द्वारे (SMS) माल घेवुन येण्याचा दिनांक कळविण्यात येईल. तरी ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे. त्या शेतकऱ्यांनी स्वतः नोंदणी साठी LIVE PHOTO अपलोड करण्यासाठी नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी भरडधान्याची नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. नोंदणी व खरेदीसाठी आपआपल्या तालुक्यातील संबंधीत सहकारी खरेदी विक्री संस्थेशी संपर्क साधावा.








