नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील करण चौफुली येथील बांधकामाचे निष्कासनाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकासह मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी आठ ते दहा जणांच्या जमावाविरुध्द नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील नगर पालिकेच्या हद्दीतील धुळे, चौफुली, नवापूर चौफुली, करण चौफुली व महाराणा प्रताप चौक या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्ता सुरक्षा व वाहतूक नियोजन मोहीम काल राबविण्यात आली. या मोहीमेदरम्यान काल दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास पालिकेचे बांधकाम अभियंता गणेश गावित व त्यांचे पथक करण चौफुली येथील बांधकामाचे निष्कासन करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी गेले होते.
यावेळी तेथील काही स्थानिकांनी चौफुलीजवळील बांधकामाचे निष्कासन करु नका असे सांगितले. तसेच मुख्याधिकाऱ्यांना बोलविण्याचा आग्रह धरला. त्यानुसार मुख्याधिकारी पुलकीत सिंह करण चौफुली येथे पोहचले असता जमावातील काही जणांनी घेराव घातला. तसेच सरकारी कामकाज करण्यात अडथळा निर्माण केला. काही जणांनी मोठ्याने आरडाओरड करुन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यादरम्यान, गणेश गावित व पथकातील कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांना शासकीय वाहनात बसवून रवाना केले. यावेळी कोणताही पोलिस बंदोबस्त त्या ठिकाणी नव्हता. याबाबत गणेश गावित यांच्या फिर्यादीवरुन दिपक बागले,बॉबी बैसाणे,आकाश अहिरे,गोविंद सामुद्रे, गोडसे, पावबा आखाडे यांच्यासह तीन अनोळखींविरुध्द नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५३, १४३, १४७, १४९, ५०४, ३७ (१), ३७, (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.