नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथे शेतीव बैल विक्रीच्या पैशांच्या कारणावरुन दोघा भावांसह आईला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील सोपान बापू धनगर व तात्या संतोष धनगर यांच्यात शेतीचा वाद व बैल विक्रीच्या पैशांच्या कारणावरुन वाद होता. या वादातून सोपान बापू धनगर यांना घरातून ओढून शिवीगाळ करण्यात आली. तसेच ज्ञानेश्वर तात्या धनगर याने सोपान धनगर यांना दगड मारुन डोके फोडले. तात्या धनगर, उषाबाई तात्या धनगर, ज्ञानेश्वर तात्या धनगर व गणेश तात्या धनगर यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. सोपान धनगर यांच्या आईस उषाबाई धनगर हिने हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच सोपान धनगर यांच्या भावालाही हाताबुक्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
तात्या धनगर याने सोपान धनगर यांच्या घराच्या ओट्यावरील दुधाचे काचेची कॅबिन व दुध फॅट मोजण्याचे मशिनला दगड मारुन तोडफोड करुन नुकसान केले. याबाबत सोपान धनगर यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.गुलाब तेले करीत आहेत.








