नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील जळका बाजार परिसरात असलेल्या चौधरी गल्लीत शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागून संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले.यात टीव्ही, फ्रिज, सोने-चांदी, ३ लाख रोख रक्कम जळून गेल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नंदुरबार शहरातील जळका बाजार परिसरातील चौधरी गल्लीत रोहित संजय चौधरी यांच्या घराला दुसऱ्या मजल्यावर दुपारी अचानक आग लागल्याने परिसरातील नागरिक भयभीत होऊन आग विझवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. घरमालक रोहित संजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून घरातील संसार उपयोगी वस्तू, धान्य, कपडे, टीव्ही, फ्रीज, कुलर सह सर्व वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाला महसूल विभागाने पंचनामा करून तत्काळ मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
रोहित संजय चौधरी यांच्या घरातील रोख रक्कम तीन लाख रुपये व दहा तोळे सोने आगीत जळून खाक झाल्याची माहिती रोहित चौधरी यांनी दिली आहे. वरच्या मजल्यावर शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीने दुपारी उन्हाची तीव्रता व हवेमुळे काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. नागरिकांनी मिळेल त्या भांड्यामध्ये पाणी घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. मात्र लहान गल्ल्या व वरच्या मजल्यावर असल्याने आग विझवण्यासाठी मशागत करावी लागली. शहरातील दाट वस्तीमुळे आग लागलेल्या घरापर्यंत अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकली नाही. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केल्याने आग काही काळानंतर आटोक्यात आली. अन्यथा दुसऱ्या घरांना आग लागून मोठी हानी झाली असती. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.








