नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बायपास रस्त्यावर जिल्ह्यातील सर्वात मोठ्ठे ४८ हजार स्केअर फुटमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन अक्षय तृतीयेच्या दिवशी २२ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त प्रसिद्ध शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या १ दिवशीय शिव चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील शहादा बायपास रस्त्यावर १२५ बेडचे छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात आलेले आहे. हॉस्पिटलचे उद्घाटन अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर २२ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी माजी आ.रघुवंशी यांनी रविवारी दुपारी हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषद घेतली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,डॉ.तुषार रघुवंशी, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,डॉ. रोशन भंडारी, माजी सभापती कैलास पाटील उपस्थित होते.
यावेळी माजी आ.रघुवंशी म्हणाले, अक्षय तृतीयेच्या दिवशी छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या प्रांगणात दुपारी १२ वाजता पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तत्पूर्वी प्रदीप मिश्रा यांचे ग.तू पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणावर सकाळी ११ वाजता आगमन होईल व तेथून कॉलेज रोड,अंधारे चौक,आमदार कार्यालय, जुनी नगरपालिका चौक,स्टेशन रोड,नेहरू पुतळा मार्गे हाटदरवाजा व तेथून राम पॅलेस निवासस्थानापर्यंत शोभायात्रा काढण्यात येईल.
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांची राहणार उपस्थिती
यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नंदनगरीत अनेक वर्ष राजकीय प्रवास केला. जनतेच्या आरोग्याच्या सोयी सुविधांची गरज लक्षात घेता.मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याच्या मानस होता तो आज पूर्णत्वास येत आहे. अक्षय तृतीयेला हॉस्पिटलचे उद्घाटन होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह अनेक मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.
१ लाख लोकांची राहणार उपस्थिती
शिव चर्चा कार्यक्रमांमध्ये साधारणता एक लाख लोकांची उपस्थिती राहणार असून, त्या पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे.३ लाख स्केअर फुट मंडपाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
उपलब्ध सुविधा
कार्डिओलॉजी,जनरल सर्जरी, अॅडव्हान्स कॅथ लॅब सुविधा,50 स्लाइस सीटी स्कॅन सुविधा,नेफ्रोलॉजी, न्यूरोसर्जरी, 17 बेडेड आयसीयू,अल्ट्रासाऊंड,7 बेडेड एचडीयू,डिजिटल एक्सरे,जनरल मेडिसिन,ऑर्थोपेडिक,5 बेडेड कार्डियाक आयसीयू,पॅथॉलॉजी लॅब,क्रिटिकल केअर,प्लास्टिक सर्जरी,न्यूरोलॉजी,सर्जिकल ऑन्कोलॉजी,नवजात शिशु आयसीयू,2 D ECHO,हेमॅटोलॉजी,स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, डायलिसिस,24 बाय 7 फार्मसी, संधिवातशास्त्र, ऑप्थल्मोलॉजी, दंतचिकित्सा,24 बाय 7 आपत्कालीन सेवा,बालरोग,रेडिओलॉजी,फिजिओथेरपी आदी सोयी सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहेत.