नंदुरबार l प्रतिनिधी
शहरालगतच्या इमाम बादशाह दर्गाह परिसरातील कब्रस्तानमध्ये अचानक कोरड्या झालेल्या गवताने पेट घेतल्याने वणवा पेटला होता. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
एप्रिल महिना अर्धा उलटला आहे. त्यातच आता जंगलांमध्ये वणवा पेटण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. नंदुरबार शहरालगतच्या इमाम बादशाह दर्गाह परिसरातील कब्रस्तानात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले होते. या गवताला शुक्रवारी अचानक आग लागली.
यात मोठ्या प्रमाणावर गवत जळून नुकसान झाले. तसेच मोठ्या प्रमाणावर कोरडे गवत असल्याने आग पसरत होती. स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने नंदुरबार पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ रवाना झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविले.
मात्र तरी देखील गवत कोरडे असल्याने काही भागात आग धुमसत होती. दरम्यान, ऊन्हाळा असल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.