नंदुरबार l प्रतिनिधी
भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक-आयशरमध्ये धडक झाल्याने घडलेल्या अपघातात चालक ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. सदरचा अपघात नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल राज दरबारजवळ घडला.
नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरुन जात असतांना काल सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास हॉटेल राज दरबारजवळ आयशर वाहन (क्र.एम.एच.२० जीसी ११२६) व ट्रक (क्र.एम.एच.१२ एनएक्स ३४६४) यामध्ये जोरदार धडक झाली. ट्रकवरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविल्याने समोरुन येणाऱ्या आयशरला धडक दिली. या अपघातात आयशरवरील चालक शेख चांद शेख मोहंमद (वय २५, रा.खातगाव ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर) हा ठार झाला आहे. तर नाजीज अजीज शेख (रा.रांजणगाव ता.पैठण) हा जखमी झाला आहे.
दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भल्या सकाळी अपघात झाल्याने काही वेळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. दरम्यान, दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला नेण्यात आली होती. अपघात घडल्यानंतर दोन्ही वाहनांचे कॅबिन चक्काचूर झाले आहे. याप्रकरणी नाजीर अजीज शेख यांच्या फिर्यादीवरुन ट्रक (क्र.एम.एच.१२ एनएक्स ३४६४) वरील चालक याच्याविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.वसंत वसावे करीत आहेत.