नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील थुवानी येथील करसन्या पाडवी यांचे घर गेल्या पाच दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत खाक झाले होते. संसारोपयोगी वस्तूंसह संपूर्ण संसाराची राख रांगोळी त्यांच्या डोळ्यासमोर झाली. यामुळे सोशल मिडीयावरुन विविध घटकांच्या माध्यमातून तसेच नर्मदा बचावच्यावतीने मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार विविध संसारोपयोगी वस्तूंसह किराणा ८३ हजाराची मदत करण्यात आली आहे. त्यामुळे आजही माणूसकी शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.
धडगाव तालुक्यातील थुवानी येथील करसन्या नाऱ्या पाडवी या आदिवासी कुटूंबाच्या घराला दि.७ एप्रिल रोजी घरातील सोलरच्या बॅटरीमुळे आग लागली. यात त्यांच्या घराची राख झाली. घरातील करसन्या पाडवी यांच्यासह त्यांच्या परिवारातील ९ जण अंगाच्या कपड्यांवर उघड्यावर आले. याबाबत स्थानिकांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करत मदतीचे आवाहन केले होते व त्यानंतर संवेदनशील नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरु झाला.
शहादा इन्कलाब ब्रिगेडच्या संदीप राजपाल यांनी पाच गाद्या, ब्लॅँकेट व काही धान्य पाठविले. तसेच शिरपूूरहून सुचित्रा वैद्य यांनी किराणा पाठविला. तळोदा येथील ताराबाई मराठे यांनी भांडी, कपडे व धान्य पाठविले. तसेच समाजातील विद्यार्थी शेतकरी, पोलिस अधिकारी, डॉक्टर यांच्यासह सर्व क्षेत्रातील प्रत्येकानी शक्य ती मदत केली आहे. सुमारे ८३ हजार रुपयांची रोकड जमा झाली आहे. तसेच विविध संसारोपयोगी वस्तू देखील मिळाल्या आहेत. यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करीत माणूसकीचा परिचय दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र शासनाकडून देखील करसन्या पाडवी यांचा संसार उभा करण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे.
करसन्या पाडवी यांचे घर जळाल्याने त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे देखील आगीत खाक झाली आहे. यामुळे शासनाने कागदपत्रांच्या नावाखाली त्यांची फाईल अडकवून न ठेवता त्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्याची अपेक्षा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व यंत्रणेने मनावर घेतले तर हे सहज शक्य होणार आहे.
– चेतन साळवे
कार्यकर्ता, नर्मदा बचाव आंदोलन