नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील वजन काट्याजवळ लोखंडी रॉडने मारहाण करीत बळजबरीने १० हजाराची रोकड काढून घेऊन पळून गेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील राजेश ईश्वरलाल परदेशी हे राष्ट्रीय महाराष्ट्र क्र.७५३ बी अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका वजन काट्यावर वाहन (क्र.एम.एच. १२ एफडी ४६५४) वजन करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याकडे १० रुपये कमी असल्याने ते ड्रायव्हरकडे पैसे घेण्यासाठी जात होते.
यावेळी एका अज्ञात इसमाने मागून येऊन लोखंडी रॉडने राजेश परदेशी यांच्या पायावर, हातावर, मानेवर मारहाण केली. तसेत त्यांच्या खिशातील १० हजार रुपये बळजबरीने काढून घेत पळून गेला. याबाबत राजेश परदेशी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात भादंवि कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन करीत आहेत.