नंदूरबार l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील थुवनी गावातील करसन्या नाऱ्या पाडावी यांच्या घराला आज सकाळी 11वाजेच्या सुमारास आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
करसन्या नाऱ्या पाडावी यांचे गरीब कुटुंब असुन मोसमी डोंगराळ शेती करून उदरनिर्वाह करते. घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू, धान्य,कपडे लत्ते आणि महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे.

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार अचानक सकाळी 11 वाजेच्या सुमारास घरातून धुराचे लोट निघताना. आजूबाजूला नागरिकांना दिसून आल्यानंतर. जवळपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु करसन्या नाऱ्या पाडावी यांचे घर टेकडीवर असल्याने वाऱ्यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते.
आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तू धान्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. करसन्या नाऱ्या पाडवी याच्या गरीब परिवाराच्या घराला आग लागून उभा संसार काही मिनिटातच जळून राख झाला आहे.
महसूल विभागाच्या वतीने सदर आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.









