नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार येथील भाजपा कार्यालयात भाजपाच्या स्थापना दिनानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. भाजपाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित, भाजपाचे महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सांसद रत्न खा. हिना गावित यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी पालकमंत्री डॉ.गावीत म्हणाले की, देशात, राज्यात व जिल्ह्यात भाजपाची सत्ता असून विकासाचे कामासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यामुळे भाजपा देशाच्या भविष्य आहे. भाजपाची सत्ता जिल्हा परिषद वर देखील असून जिल्हा परिषदेमार्फत अनेक चांगले उपक्रम राबवले जात आहेत, त्यात सर्वात महत्त्वाच्या जिल्हा परिषद आपल्या दारी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना घरपोच सुविधा मिळत आहे. कुठलाही कार्यालयात जाऊन विनवण्या करण्याची वेळ येत नाही.तर प्रत्येक कुटुंबांना घरकुल मिळेल यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. त्यासोबत जलसंधारणमुळे गावातील शिवारात बंधारे बांधत आहे, तर जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळेल, अशी महत्त्वाची योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत जिल्हा परिषदेकडून राबवली जात आहे असे ते म्हणाले.

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत म्हणाल्या की, जिल्हा परिषद वर आलेले भाजपच्या सत्तेमुळे अनेक विकासाचे कामांना चालना मिळत आहे. तर येणाऱ्या काळात आणखीन नवीन आणि चांगल्या योजना लोकांसाठी प्रभावीपणे राबवणार यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. भाजपा मुळे जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाल्याने मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे भाजप देशापासून तर गाव पातळीपर्यंत विकासासाठी महत्त्वाच्या असून आज स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भाजपाचे महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सांसद रत्न खा. हिना गावित यांनीही मार्गदर्शन केले.









