नंदुरबार l प्रतिनिधी
अस्थीव्यंग शस्त्रक्रियेसाठी आदिवासी विकास विभागामार्फत निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
त्यांच्या हस्ते आज रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ, देवनार, ठाणे हिल्स, कॉव्हेटरी फोनिक्स आणि नंदनगरी, डॉ.हेडगेवार सेवा समिती,नंदुरबार व नंदुरबार जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, नंदुरबार यांच्यावतीने जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे आयेाजित मोफत अस्थीव्यंग (दिव्यांग ) सुधारक शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ.शिवाजी सुक्रे, जिल्हा रुग्णालयाचे सर्जन डॉ.राजेश वसावे, सिनीयर ॲनेस्थेशियालॉजीस्ट, मुंबईचे डॉ.प्रमोद काळे, डॉ.मयुरेश वारके, डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्ण्दास पाटील, महाराष्ट्र राज्य औषध परिषद, मुंबईचे विनय श्रॉफ, डॉ.हेडगेवार सेवा समितीचे सचिव, डॉ.नितीन पंचभाई, स्मित हॉस्पिटलचे संयोजक निलेश तवर, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष अनिल शर्मा, जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएनशनचे सुनिल चौधरी, संतोष वसईकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.गावित म्हणाले की, आदिवासी बहुल जिल्ह्यातील अस्थीव्यंग (दिव्यांग) शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यासाठी जो काही निधी लागेल ती आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध करण्यात येईल. प्रथम अशा प्रकारचे अस्थीव्यंग शिबीर पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्यात घेण्यात येईल त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर आदिवासी बहुल जिल्ह्यात घेण्यात येईल.
स्वांतत्र्याच्या 75 वर्षानिमित्त येत्या दोन वर्षांत राज्यातील गरीब लोकांना ज्यांच्याकडे घरे नाहीत अशा सर्वांना 100 टक्के घरकुल देणार असून दुर्गम भागातील बारमाही रस्ते तयार करण्यासाठी 4 हजार कोटीची तरतूद केली असून यावर्षी 2 हजार कोटींची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या संस्थेमार्फत गोरगरीब, आदिवासी नागरिकांना शस्त्रक्रियेंसाठी जी मदत केली जाते त्यांचा आनंद खुप असतो. अशा गरीब लोकांना केलेली मदत तो कधीही विसरत नाही असे त्यांनी सांगितले.कार्यकाचे सुत्रसंचलन उमेश शिंदे आभार रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल शर्मा यांनी मानले कार्यक्रम यशस्वीते साठी रोटरीचे मनोज गायकवाड सैय्यद शेख जितेंद्र सोनार जयेश महेश्वरी परिश्रम घेतले.








