नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा कारागृहात कर्तव्यावर असणार्या होमगार्डंनी आरोपींना गांजा पुरविण्याच्या उद्देशाने चार प्लास्टिक पिशव्यांमध्ये घेवुन फिरतांना आढळुन आल्याने नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील धुळवद येथील रहिवाशी अनिल चुनिलाल वळवी हा नंदुरबार येथील जिल्हा कारागृहात होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. दि.२६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास होमगार्ड अनिल वळवी हा जिल्हा कारागृहातील तट क्र.३ येथे कर्तव्यावर असतांना स्वयंपाक गृहाकडे संशयास्पदरित्या फेर्या मारतांना पोलीसांना आढळून आला.
यामुळे त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात मनोव्यापारावर परिणाम करणारा सुका गांजा सदृष्य अंमली पदार्थ व रोख रक्कम ५ हजार १६० रुपये असे कारागृहातील आरोपींना पुरविण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कब्जात बाळगतांना आढळून आला. याबाबत जिल्हा कारागृहातील सुभेदार जनार्दन गोपाल बोरसे यांच्या फिर्यादीवरुन एनडीपी ऍक्ट कलम १९८५ चे कलम २०, २२ प्रमाणे नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी करीत आहेत.








