चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर
चिनोदा : बाळदा (ता.कुकरमुंडा, गुजरात) येथील दोडे गुजर समाजाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सर्व ग्रामस्थ बंधू, भगिनी सर्वांनी मिळून समाजात गेल्या काही वर्षांपासून नविन व काही जुन्याही चालीरिती बंद करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
सदर कार्यक्रमास ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतीसाद लाभला. काही नविन व जुन्या अनिष्ट चालीरिती गावातील असंख्य नागरिकांना नकोच होत्या त्या बंद व्हायला हव्या हे सांगण्यासाठी त्यांना जेव्हा व्यासपीठ भेटले तेव्हा या अनिष्ट चालीरीतींचे दुष्परिणाम अनेकांनी मांडले. सदर कार्यक्रमात बाळदा गावासाठी नियमावली बनवण्यात आली असून त्यात रिंग सेरेमनी (साखरपुडा), प्रिवेडिंग शूट, बेबी शॉवर, घरोघरी जाऊन वऱ्हाडींना आमंत्रण, नवरदेवासाठी बग्गीचा ऐवजी घोड्याचाच वापर करणे वरील प्रथा, चालीरीती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
दोडे गुजर समाजातील जे कुटुंब या नियमावलीचे उल्लंघन करेल त्या कुटुंबाकडून कुठलाही दंड न आकारता त्यांच्या लग्न कार्यात गावातील एकही गावकरी उभा राहणार नाही हे जाहीर करण्यात आले. या धाडसी निर्णयाबद्दल सर्व ग्रामस्थांचे व विशेष म्हणजे स्त्रीवर्गाचे कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
तसेच यावेळी ज्या उपवर मुला-मुलींचे साखरपुडे झाले आहेत त्यांनी निर्णय मान्य केल्याबद्दल त्यांचा समाज अध्यक्ष यशवंतभाई पटेल यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदर चर्चेची संकल्पना कांतीलालभाई चौधरी यांनी मांडली. कार्यक्रमास कन्हैयाभाई पटेल, शांतारामभाई पटेल, मोहनभाई गोहिल, सुनिलभाई पटेल, राजेंद्र चौधरी उपस्थित होते.