नंदूरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या बृहत आराखड्याला तात्काळ मंजुरी द्या अशी मागणी आ.आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेच्या सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारा केली. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाची प्रलंबित मागणी लवकरच मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाच्या बृहत आराखडयानुसार जिल्ह्यात ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५० आरोग्य उपकेंद्र २०१९ पासून प्रस्तावित आहेत. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे अक्कलकुवा धडगाव सारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा मिळण्यास विलंब होतो. तसेच अनेक ग्रामस्थ आरोग्य सेवेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शासन प्रलंबित उपकेंद्रांना केव्हा मंजुरी देणार असा प्रश्न आ.आमश्या पाडवी यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सदर काम हे अचूक पूर्ण केले जात असून येत्या १ महिन्यात जिल्ह्याचा प्रत्यक्ष दौरा करुन अतिरिक्त अडचणी समजून घेत सदर आराखड्यास मंजुरी देऊन कामे केली जातील असे आश्वासित केले.
परंतू ही माहिती देताना मंत्री महोदयांनी काही चुकीची माहिती देखील सभागृहास दिली. यावरुन आ.आमश्या पाडवी यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
याशिवाय गत २ महिन्यापासून निधीअभावी दुरुस्तीसाठी रखडलेल्या ३ बोट ऍम्ब्युलन्सलाही निधी उपलब्ध करून देण्याबाबत पत्र व्यवहार केला होता. त्यामुळे बोट ऍम्बुलन्सचा प्रश्न देखील मार्गी लागण्याची शास्वती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी आ. आमशा पाडवी हे सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.