नंदुरबार | प्रतिनिधी
राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना ही शिक्षकांच्या प्रश्नास शासन स्तरावर प्राधान्य देत नाही किंवा उदासीन असते. त्यामुळे दि.14 मार्च 2023 पासून होणार्या संपास पाठींबा देण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने निर्णय घेतला नव्हता. परंतु जुनी पेन्शन योजना लागू करणे ही देशातील व राज्यातील शिक्षक बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बाब असल्याने तसेच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी देशात प्रथम महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांनीच सर्वात अगोदर पुढाकार घेवून संघटन तयार केले आहे व या संघटनमध्ये राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारीच सक्रीय सहभागी असल्यामुळे दि.14 मार्चपासून मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपास शिक्षक संघाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष सतिष पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघ व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय नेते संभाजीराव थोरात यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष यांची बैठक घेण्यात येवून सर्वानुमते दि.14 मार्चपासून पुकारलेल्या संपास पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य संघाचे गेल्या महिन्यात रत्नागिरी येथे भव्य अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात जुनी पेन्शनसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासमोर आग्रही भुमिका मांडणी होती. त्यांनी व्यासपीठावरुन जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत व शिक्षकांच्या इतर मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक घोषणा करुन समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु संपाची हाक देणार्या मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने आजपर्यंत शिक्षकांचा विविध मागण्या समस्या यांना दुय्यम स्थान दिलेले आहे. तरीही सर्व कर्मचारी यांची एकजुट असावी. म्हणुन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ या संपास जाहीर पाठींबा देत आहे. तसेच जुनी पेन्शन योजना लागू झाल्याशिवाय हा संप मागे घेवु नये, अशी शिक्षकांची अपेक्षा आहे. संपाच्या आडून स्वतःचेच प्रश्न सोडवून घेवुन पुन्हा शिक्षकांना वार्यावर सोडू नये. त्यांनी हा संप मागे घेतल्यास शिक्षक संघ पुर्ण तातडीने राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
तरी या संपास नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक संघाच्या सर्व राज्य, तालुका, जिल्हा पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष सतिष पाटील, राज्य सहसचिव प्रविण देवरे, महिला आघाडी प्रमुख उज्वला बेडसे, जिल्हा सरचिटणीस अमोल शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय घरमोडे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय बाविस्कर, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष आनंदराव करनकाळ, संजय बागुल, विवेक विसपुते, संजय पाटील, उल्हास लांडगे, गुलाब पाटील, राजेंद्र पाटील, रावसाहेब पाटील, मनोज पवार, भगवान बागुल, जितेंद्र बोरसे, शशिकांत पाटील, प्रभाकर ठाकरे, गुलाब चौधरी, नारायण नांद्रे, राजेंद्र बोरसे, विजय पराडके आदींनी केले आहे.