नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील पूर्व भागात गारपिटीने चांगलेच झोडपले असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला आहे. महसूल विभागाने त्वरीत पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्यांकडून होवू लागली आहे.दरम्यान वीज पडून नंदूरबार तालुक्यात ३ तर नवापूर तालुक्यात १ गुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
होळीच्या दिवशी दुपारनंतर वातावरणात बदल झाल्याने सायंकाळच्या सुमारास वादळी वार्यासह गारपिटीच्या पावसाला सुरूवात झाली. यात वैंदाणे, तलवाडे बु., खर्दे खुर्दे, सैताणे, बलवंड, रजाळे, शनिमांडळ, ढंढाणे, वावद या परिसरात संध्याकाळी अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी होवू लागली आहे.

परिसरात गारपिठ झाल्याने गहू, कांदा, मिरची, डांगर, टरबूज, हरभरा, पपई, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेल्या काही पिकांमुळे परिसरातील नुकसान झालेले शेतकरी हवालदिल झाले असून महसूल विभागाने या परिसरात विनाविलंब पंचनामे करावेत आणि शेतकर्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होवू लागली आहे. या गारपिटीमुळे तलवाडे बु. येथे डांगरसह कांदा व गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात आधीच खरीप हंगामात पाऊस झाल्याने शेती उत्पन्न घटले होते. कसेबसे सावरत असतांना अवकाळीने शेतकर्यांच्या चिंता वाढवल्या असून यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.
दरम्यान नंदुरबार तालुक्यातील कंढरे येथे सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता. याचा दरम्यान कंढरे येथील शेतकरी किशोर हिम्मत पाटील यांच्या मालकीचे दुग्ध जनावर खळ्यात बांधलेले होते. यात दोन गाई व एक गोऱ्यावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर नवापूर तालुक्यातील खानापूर येथील विजू रामा गावित यांच्या म्हशीच्या अंगावर अचानक विज पडल्याने मृत्यू झाला आहे.काही गावात घराचे नुकसान झाल्या च्या घटना घडल्या आहेत.








