मोलगी l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेत अतिदुर्गम भागातील डाबच्या मोरीराहीपाडा येथील देवाची होळी शुक्रवारी पहाटे पेटविण्यात आली.या होळी सह सातपुड्याच्या होलीकोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.
यावेळी नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्याच्या विविध भागातून आदिवासी बांधव उपस्थित होते. गुरुवारी सायंकाळपासून येथे बावा, बुध्या, मोरखी,धानका,डोखा यांचे नृत्य सुरू झाले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर पहाटे गाव पुजारांच्या हस्ते विधिवत पूजन करून देवाची होळी पेटविण्यात आली. डाब (मोरीराही) येथील होळी पेटल्यानंतर आता सातपुड्यातील विविध ठिकाणी होळींना सूरुवात होणार आहे.
होळीच्या पाश्वभुमीवर नवस केलेच्या आदिवासी बांधवांकडून पाळणी सुरु करण्यात आली आहे .पादत्राणे न घालणे, खाटेवर न बसणे, सत्शील वर्तन ठेवणे, निंदा न करणे आदी नियम पाळण्यात येत आहेत. आरोग्य चांगले राहो, वरुण राजाची कृपादृष्टी होवो, चांगला पाऊस पडून शेती हिरवीगार होवो, धन,धान्य, वैभव. सुख,शांती,समृद्धी नांदावी यासाठी हा नवस केला जातो.
देवहोळीनंतर इतर किकाणी होळी पेटणार डाब (मोरीराहीपाडा) येथील होळी ही देवाने ठरवून दिलेली पहिली होळी अशी धारणा आदिवासी बांधवांमध्ये आहे. या होळीसाठी सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिक डाब येथे बुधवारपासून दाखल झाले होते .याहामोगी देवीचे जन्मठिकाण असलेल्या देवगाई येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली . डाबच्या देवहोळीनंतर वालंबा ,तोडीकुंड, काठी यासह ठिकठिकाणी होळी पेटणार आहे. यात जागोजागी मोरखी,बुध्या, बावा ,धानका,डोखा हे गेर नृत्य आदिवासींकडून केले जाणार आहे.








