नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सन २०२२-२३ या वर्षाचा सुधारीत व सन २०२३-२४ मुळ अर्थसंकल्प सादर झाला असून महसूल व भांडवली अशी एकूण ७० कोटी ६६ लाख १७ हजार ७७९ रुपयांचे अंदाज पत्रक सादर करण्यात आले. यातील सन २०२३-२४ मध्ये संभाव्य खर्च वजा जाता २८ कोटी ९८ लाख २७ हजार ३७४ रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प वित्त समिती सभापती गणेश पराडके यांनी सादर करीत ग्रामीण क्षेत्राच्या समतोल विकासाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नंदूरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात सन २०२२-२३ या वर्षाचा सुधारीत व सन २०२३-२४ या वर्षाचा मुळ अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह वित्त समिती सभापती गणेश पराडके तसेच सभापती संगिता गावित, हेमलता शितोळे, शंकर पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते.
यावेळी सन २०२२-२३ या वर्षाचा सुधारीत सन २०२३-२४ या वर्षाचा मुळ अर्थसंकल्प सादर करतांना वित्त समिती सभापती गणेश पराडके म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या अनुदानात स्थानिक उपकर, वाढीव उपकर, स्थानिक उपकर सापेक्ष अनुदान, मुद्रांक क्षुल्क आदींचा समावेश होतो. तो विचारात घेऊन जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या स्वउत्पन्नाची जमा रक्कम विचारात घेऊन ग्रामीण क्षेत्राच्या समतोल विकासाकरीता निधी उपलब्ध करुन देणारे अंदाज पत्रक सादर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील समस्या व जिल्हा परिषदेस प्राप्त होणारे मर्यादीत उत्पन्न याचा मेळ घालून ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूदी उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे श्री.पराडके म्हणाले. तसेच पंचायत समिती वाढीव उपकर अनुदान, घसारा निधी व ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती निधी जमा व खर्चाचे सुधारीत मुळ अंदाज पत्रक याप्रसंगी सादर करण्यात आले.
नियमबाह्य सभा होत असल्याचा आरोप करत विरोधकांचे निवेदन
दि.३ मार्च रोजी झालेल्या जि.प.ची सर्वसाधारण सभा नियमबाह्य होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसाधारण सभा घेणे आयत्या वेळेचा विषय होवू शकत नाही. सदरची बाब नियमास धरुन नाही. दि.२ मार्च रोजी सायंकाळी मोबाईलच्या व्हॉटस ॲपवर सभेची सुचना प्राप्त झाली. खरे तर सात दिवस आधी याबाबत कळविणे अपेक्षित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच अजेंड्यावरील विषय क्रमांक ४,५,६,७ व ८ हे सभेच्या नियमास धरुन नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर सभागृह विरोधी पक्षनेते रतन पाडवी, गटनेते सी.के.पाडवी तसेच जि.प.सदस्य मधुकर नाईक, राया मावची, जितेंद्र पाडवी, प्रताप वसावे, देवमन पवार, जान्या पाडवी, ॲड.सीमा वळवी, निर्मला राऊत आदींच्या सह्या आहेत.