म्हसावद | प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील व शहादा येथून ६० की.मी. च्या दुरीवर वसलेल्या तोरणमाळ हे राज्यातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण आहे.येथे महाशिवरात्री निमित्त दि.१८ फेब्रुवारी पासून श्री.गोरक्षनाथ महाराजांची यात्रेस प्रारंभ होत आहे.या यात्रेत महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश राज्यातुन लाखो भक्त हजेरी लावत असतात.

महाराष्ट्रातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे धडगांव तालुक्यातील तोरणमाळ या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त श्री.गोरक्षनाथ महाराजांची भव्य यात्रा भरते. मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात येथून यात्रेकरू मोठ्या संख्येने येत असतात तिन्ही राज्याच्या मध्यभागी असल्याने यास आणखीच महत्व प्राप्त होते.महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळ ते संध्याकाळ पर्यंत येणारे भाविक हे सोबत पीठ आणतात व हे पीठ एका दिवसात पंधरा पोत्यात गोळा होते या पिठातून सव्वा मनाचा रोडगा करून त्यास पांढर्या शुभ्र कपड्यात गुंडाळून सुताने बांधले जाते व त्यास विस्तवावर भाजले जाते.
यानंतर याच प्रसादाचे वाटप हे पहाटे केले जाते. ज्याला हा प्रसाद मिळालं तो आपली यात्रा सफल झाल्याचे समजतो यात्रेतून जाताना भाविक हवन कुंडातील रक्षा घेऊन जातात.
तोरणमाळ नावाचे रहस्य
या उंच असलेल्या ठिकाणचे नाव तोरणमाळ का पडले याबाबत अख्यायीका प्रसिध्द आहे.तलावपासून उंच ठिकाणी तुरीचे मोठे झाड होते त्या झाडाचा आश्रय श्री. गोरक्षनाथ महाराज यांनी घेतला होता उन्हाळा,हिवाळा, पावसाळा तिन्ही ऋतू हे हिरवेगार राहत असे त्याचा बुंध्याचा आकार वडाच्या झाडाप्रमाणे होता ते जरी आज अस्तित्वात नसले तरी श्रद्धाळू पहाटे हरिनामाचा गजर करीत डोंगर चडून झाड असल्या ठिकाणी पूजा करतात.
तोरणमाळ येथे असलेल्या तलावात श्री. गोरक्षनाथ यांनी आपली पाठ जमिनीला न लागुदेता पाण्यात राहून तपस्या केली होती तपस्या भंग न होऊ म्हणून दिवसा गुरे चारून रात्री तपस्या करीत असत आजही तलावात गोरक्षनाथ महाराज यांचे मंदिर असून ते महाशिवरात्रीच्या रात्री पुण्य कर्मी यांनाच पाण्यावरचे दिसतात असे भाविक सांगतात. तलावास पायी प्रदक्षिणा घातल्यास एक तास लागतो.
गोरक्षनाथ मंदिर व सीताखाई
तलावाच्या किनार्यावर असलेले श्री.गोरक्षनाथ मंदिर यावर भाविकांच्या रांगा देव दर्शनासाठी लागलेल्या असतात अक्षरशा पोलीस बंदोबस्तात दर्शन घ्यावे लागते. मंदिराच्या उत्तरेस २ की.मी. अंतरावर खोल अशी दरी आहे त्याला सीता खाई असे म्हटले जाते प्रभू रामचंद्र आणि सीता माता यांचा रथ या खाईतून वर गेलेला आहे. त्या रथाच्या चाकाच्या खुणा खडतर दरीच्या उभ्या असलेल्या भागावर आहेत असे भाविक सांगतात
तोरणमाळ जात असतांना घाटाच्या शेवटच्या टप्यावर रस्त्याला लागून एका डोंगरात कोरलेलं मंदिर असून नावाप्रमाणे यात नग्न अवस्थेंत चार ते पाच फूट उंच नागार्जुन ची मूर्ती आहे.
तोरणमाळ पासून ३ ते चार की.मी. पर्यंत अंतर असलेल्या खडतळ रस्ता असलेल्या मच्छिंद्र गुफा आहे. इंग्रजी अक्षराच्या व्ही आकाराप्रमाणे असून यात प्रथम उभ्याने नंतर वाकून व झोपून क्रमशः जावे लागते एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकतो. आत दोन साधू दिवस भर दिवे लावून बसलेले असतात आत जाऊन लिंगाची पूजा करून परत येतात. यात्रेत सर्व व्यापारी वर्गांना मुबलक जागा,पाण्याची व्यवस्था,इतर सोयी सुविधा व भाविकांसाठी येण्याजाण्यासाठी वाहनांची व राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्था तर्फे केली जात असते. यासाठी सरपंच सौ.इंदाबाई चौधरी, उपसरपंच रमेश चौधरी व सर्व ग्रा.प.सदस्य यांच्यासह ग्राम विकास अधिकारी डी.डी.पाटील,माजी सरपंच मधुकर चौधरी, पहाडसिंग नाईक,पोलिस पाटील ओलसिंग नाईक,सुक्करसिंग नाईक,अर्जुन नाईक,माजी सरपंच जयसिंग चौधरी,जीवन रावताळे यांच्यासह सर्व माजी ग्रा.प.सदस्य,मित्र मंडळी,ग्रामस्थ,तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत .
तसेच यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील,शहादा पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्यासह तोरणमाळ दुरक्षेत्र चे पोलिस हवालदार चंदू साबळे,छोटूलाल पावरा,नाईक योगेश निकम यांच्यासह वाहतुक पोलिस कर्मचारी,वाढीव पोलिस दल यांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.









