शहादा l प्रतिनिधी
आधुनिक काळात वावरत असतांना पारंपरिक अनिष्ट परंपरा त्यागत समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य करीत आदर्श निर्माण करण्याचे काम केले जात आहे.असाच एक विधवा महिलांसाठी हळदीकुंकू हा आदर्श व धाडसी उपक्रम जायन्ट्स दामिनी सहेली शहादा ग्रुपच्या अध्यक्षा अलका चौधरी यांनी ह्यावर्षी सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले जात आहे.
अकाली वैधत्व आलेल्या विधवा स्त्रियांच्या हळदी- कुंकूवाचा उपक्रम राबविण्यात यावा असा गत 2-3 वर्षापासून श्रीमती अलका चौधरी यांच्या मनात विचार येत होता. विधवा महिलांसाठी हा नवीन उपक्रम घेण्याचा विचार सतत त्यांच्या मनात सुरू होता. योगायोगाने ह्यावर्षी दामिनी सहेली शहादा ग्रुपची अध्यक्षपदावर त्यांची निवड झाली व हा योग जुळून आला. विधवा स्रियांचा सन्मान म्हणून हळदी-कुंकू लावून समाजाला एक नवीन विचार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. स्त्रीचे मन हे फक्त एक स्त्रीच समजू शकते या दृष्टिकोनातून या खास समारंभाचे आयोजन केल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्रीमती अलका चौधरी म्हणतात,खरं तर पती नसलेल्या स्रियांचे हळदी-कुंकू या विषयावर कोणी विचारच केला नाही . उलट हळदी-कुंकूचा समारंभात विधवा स्रियांना टाळून अपमानितच केले जाते.ह्या स्रियांना सन्मानाची वागणूक देणारा एखादा सण असू शकत नाही कां? कोणत्याही शुभ कार्यात या स्रियांना पुढे का येऊ दिले जात नाही. जर ती स्त्री पुढं आलीच तर तिला रागावण्यात येत.तुझं इथं काय काम आहे.असे सांगून अपमानित करून मागे ढकललं जात. ज्या स्रियांचा नवरा आहे त्याचंच समाजात मूल्यमापन करणार कां? खरं तर विधवा स्रियांना समाजाने समजून घेतल पाहिजे. त्यांना समाजाकडून भावनीक आधाराची गरज असते. मायेची गरज असते. पुरुषांच्या अकाली मृत्यू होतो तेव्हा तीच स्त्री सगळं विसरून आपल्या मुलांना साभाळते.
त्यांच्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य संघर्षात ओवाळून टाकते. आणि समाज अशा स्रियांना आधार, मानसन्मान देण्याच सोडून अनेक समारंभात त्यांना बोलवायचे टाळतात. ही खंत कुठं ना कुठं मनात टोचली होती.म्हणूनच मी विधवा स्रियांसाठी हळदी-कुंकू घ्यायचे ठरवले. हा कार्यक्रम घेतांना मला खूप दडपण आलं होतं. विधवा स्रियांना हळदी-कुंकूला बोलावल तर काय प्रतिक्रिया असेल? पण त्या स्रियांनी स्वखुशीने हळदी-कुंकू लावून घेतले. आपल्या मनातील आत्मसमानाची जी आस होती ती व कसे अपमानीत केले जाते ती खंत व्यक्त केली व आपले मन हलके केले.त्या म्हणाल्या ,मी स्वतः विधवा स्त्री आहे आणि मलाही ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावे लागले आहे. म्हणूनच मी हा उपक्रम राबविला. फार पूर्वी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी किती हाल सोसले.त्यांनी महिलांना जो हक्काचा आहे तो सन्मान मिळवून दिला. आपल्याला हा इतिहास तर माहीतच आहे. जर त्या पुरुषप्रधान संस्कृतीत त्याकाळी स्रियांसाठी झटल्या तर आपण ही आधुनिक काळात त्याच सावित्रीबाई चा वारसा म्हणून का झटू शकत नाही? म्हणूनच मी हा छोटासा उपक्रम राबविला व मला त्यात भरभरून प्रतिसाद मिळाला. माझ्या ह्या छोट्या उपक्रमाला सगळ्या मैत्रिणींनी खूप साथ दिली.त्या माझ्यासोबत उभ्या राहिल्या म्हणून त्याचे खूप खूप आभार मानते. हा उपक्रम मी नेहमीच चालू ठेवले आणि समाज मला नक्कीच साथ देईल हीच आशा ठेवते.श्रीमती चौधरी यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले जात आहे.








