म्हसावद l प्रतिनिधी
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात यावी, इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांना देखील १०, २०, ३० च्या लाभाची योजना मंजूर करावी अश्या विविध मागण्यांसाठी पुणे येथील शिक्षण आयुक्तांचा कार्यालयावर येत्या १३ फेब्रुवारीला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. पी. महाले यांनी केले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केल्याप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील १०, २०, ३० च्या लाभाची योजना मंजूर करावी. शिक्षकेतर आकृतीबंधाबाबत नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेला अहवाल जसाच्या तसा मंजूर करुन शिक्षकेतरांच्या भरतीस त्वरीत परवानगी मिळावी. राज्यातील शिक्षकेतरांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना तात्काळ मान्यता देण्यात याव्यात. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील त्रुटी तात्काळ दुर करण्यात याव्यात. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनाअनुदानित वरून अनुदानित पदावर बदलीस मान्यता मिळावी. विनाअनुदानित तुकडीवरील विद्यार्थी संख्या शिक्षकेतर पदे मंजूर करताना ग्राह्य धरावी. तसेच उच्च माध्यमिकसाठी स्वतंत्र लिपीकासह इतर शिक्षकेतर कर्मचारी देण्यात यावे अश्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
या मागण्यांसाठी शिक्षकेतर संघटनेचे राज्य कार्यवाह शिवाजी खांडेकर व अध्यक्ष अनिल माने यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मोर्चा काढण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष डी. पी. महाले, कार्यवाह इसरार अली सय्यद, उपाध्यक्ष जुबेर, माधव पाटील, महेंद्र सूर्यवंशी, रामा चव्हाण, खजिनदार जयेश वाणी , प्रशांत पवार, अमित मराठे, संजय भामरे, वासू पटेल, योगेश चव्हाण, निलेश पाटील, हेमंत ठाकरे, महेंद्र पाटील, अस्लम पिजारी, नरी सर आदींनी केले आहे.