नंदूरबार l प्रतिनिधी
गोरगरिबांना स्वप्नातील हक्काचे घर मिळण्यासाठी असणाऱ्या घरकूल योजनांमधील तब्बल ३१६९ घरकुले तळोदा तालुक्यात अद्यापही अपूर्ण आहेत. त्यात ९७८ घरकुलांचे काम सुरूच झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घरकुले पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर जनजागृती सह गावोगावी भेट दिली जात आहे. दुसरीकडे अपूर्ण राहिलेली घरकुले मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून यंत्रणेला मिळाल्या आहेत. दिलेल्या मुदतीत घरकुले पूर्ण न केल्यास निधी परत जाण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे अपूर्ण राहिलेली घरकुले पूर्ण करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
तळोदा तालुक्यात सन २०१६-१७ ते २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेत १० हजार ६२१ घरकुले मंजूर होती. त्यापैकी ९ हजार ४२९ घरकुले पूर्ण झाली असून ११७५ घरकुले मात्र अपूर्ण आहेत. तर २६६ घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत. तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात २०१३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती त्यापैकी ४७१ घरकुले पूर्ण झाले असून १६२२ घरकुले अपूर्ण आहेत. त्यातील ६०७ घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत.
शबरी आवास योजनेत सन २०१६-१७ ते २०२१-२२ या आर्थिक वर्षात १४६१ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी ११०५ घरकुले पूर्ण असून ३३९ घरकुले अपूर्ण आहेत. ९९ घरकुलांचे बांधकाम अद्यापही सुरू झालेले नाही. तर रमाई आवास योजनेत २४६ घरकुले मंजूर असून २०६ घरकुले पूर्ण झाले आहेत तर ३३ घरकुले अपूर्ण आहेत व ६ घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत.
घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत घरकुल पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. तरीही बांधकाम सुरू न झाल्यास फेब्रुवारी अखेर अशी घरकुले रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे त्यानंतर शासनाकडून कुठलाही निधी दिला जाणार नसल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे घरकुले पूर्ण करून घेण्याचे यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. याकरिता अमृत महा आवास अभियानांतर्गत जलद गतीने घरकुलांचे कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली अमृत महा आवास अभियानांतर्गत घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परशुराम कोकणी ,सहाय्यक गट विकास अधिकारी के एम पवार ,विस्तार अधिकारी बी के पाटील यांनी प्रतापपूर येथे भेट देऊन लाभार्थ्यांना घरकुले पूर्ण करण्याचा सूचना दिल्या. तशी मोहीम तालुक्यातील सर्व गावात राबवली जाणार आहे.