नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील पातोंडा येथे दुचाकी व हातागाडी रस्त्यावर लावण्याच्या कारणावरुन पिता-पुत्रास मारहाण करुन वडीलांना कुऱ्हाडीने वार करुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील पातोंडा येथील रणछोड भिल यांनी त्यांच्या ताब्यातील टेम्पोरिक्षामध्ये टाईल्स घेवून घरी आले. यावेळी सुनिल उर्फ सन्या रंगू भील याला रस्त्यावरील हातगाडी व दुचाकी बाजूला करा, असे सांगितले. याचा राग आल्याने रणछोड भिल यांना सुनिल भील व जगन भील यांनी रणछोड भील यांना धक्काबुक्की करीत काठीने मारहाण केली व बिजू भील याने शिवीगाळ केली. तसेच जगन भील याने रणछोड भील जिवेठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने डोक्यावर वार करुन दुखापत केली.
तसेच रणछोड भील यांचा मुलगा विशाल रणछोड गावित यालाही मारहाण केली. याबाबत विशाल गावित यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.








