नंदूरबार l प्रतिनिधी
खत कंपन्यांकडून होणारे रासायनिक खतासोबतचे लिंकिंग बंद होणे बाबत नंदुरबार फर्टिलायझर, पेस्टीसाईडस् सिडस् डिलर्स असोसिएशनतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या अनेक खत कंपन्या रासायनिक खतांच्या सोबत लिंकिंग मटेरियल घेण्यास विक्रेत्यांना भाग पाडत आहेत. लिंकिंग शिवाय कंपन्या खत पुरवठा करण्यास तयार होत नाहीत. शासनाने सुद्धा कंपन्यांना लिंकिंग न करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच विक्रेत्यांना सुद्धा लिंकिंग केल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा दिलेला आहे.
लिंकिंगमुळे शेतकरी आणि विक्रेते यांच्यात वादविवाद होत आहेत. शेतकर्यांना काही प्रमुख रासायनिक खतांच्या ग्रेडची आवश्यकता आहे. मात्र त्या खतांवर लिंकिंग मटेरियल घ्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. व विक्रेत्यांचे व शेतकर्यांचे संबंध बिघडत आहेत. विक्रेत्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर आपण स्वतः लक्ष घालून लिंकिंग बंद करण्याविषयी कंपन्यांना कडक सूचना द्याव्यात ही विनंती. तसेच कंपन्यांनी लिंकिंग बंद न केल्यास जिल्ह्यातील सर्व रासायनिक खत विक्रेते बेमुदत आपली दुकाने बंद ठेवतील व शेतकर्यांना होणाऱ्या गैरसोयीची संपूर्ण जबाबदारी खत कंपन्यांची राहील असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर निवेदन नंदुरबार फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस् सिडस् डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्रसिंग राजपूत, कार्याध्यक्ष कन्हैयालाल पटेल, सचिव राजेशकुमार वाणी आदींच्या सह्या आहेत.








