नंदूरबार l प्रतिनिधी | नंदूरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींच्या कार्यालयात ग्राम विकास अधिकारी यांना सक्तीने बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याचे पत्र राज्य शासनाचा ग्राम विकास विभागाने सहाही विभागाचा आयुक्तांना दिले असून या प्रकरणी तातडीने कार्यवाही करून तसा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील ६३९ ग्राम पंचायती मध्ये बायोमेट्रीक यंत्रे बसणार आहेतं. शासनाचा या पत्रामुळे सबंधिताना ग्राम पंचायत कार्यालयास दररोज नियमीत भेटी द्याव्या लागणार असल्याने ग्रामीण जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
ग्रामीण खेड्यांचा विकासात ग्राम पंचायत ही स्थानिक संस्था अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असते साहजिकच गावांचा या संस्थांचा प्रशासकीय काम करणारे ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी हा देखील महत्वाचा घटक असतो.कारण ग्राम पंचायत प्रशासनाशी ग्रामीण जनतेचा सतत संपर्क येतो. तसेच या बाबत राज्याचे मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्राची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी यांनी गावात नियमीत भेटी देवून कामे मार्गी लावावी म्हणून प्रत्येक ग्राम पंचायतीचा कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसवून बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याचे पत्र राज्यातील कोकण,नाशिक, पुणे,औरंगाबाद,नागपूर,अमरावती या सहाही विभागीय आयुक्तांना देण्यात आले असून आपल्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदांना तातडीने लागू करण्याची सूचना देण्यात आली आहे.
शिवाय या प्रकरणी तातडीने कार्यवाही करून तसा अहवाल एकडे सादर करण्याची सूचना देखील पत्रात नमूद केली आहे.अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान ग्राम पंचायत कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याचे आदेश शासनाने दिले असून साहजिकच आता काम चुकाराना आपोआपच चाप बसणार आहे.त्यामुळे ग्रामीण जनतेने शासनाचा भूमिका बाबत समाधान व्यक्त केले असून जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीचा प्रशासनाने बायोमेट्रिक प्रणाली बाबत प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.








