शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन नवलपूर येथे संपन्न झाले .
उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रारंभी देवी सरस्वती, मंडळाचे संस्थापक परिसराचे भाग्यविधाते अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 75 व त्यापेक्षा अधिक वृक्षांची लागवड करून बिसलरीच्या बॉटल्सच्या सहाय्याने ठिबक सिंचन केले. वृक्ष संवर्धनासाठी ट्री गार्ड उपलब्ध करून दिले. ग्रामपंचायतच्या मार्फत रेशन कार्ड नंबर व बँक पासबुक नंबरचे कौटुंबिक सर्वेक्षण करून सहकार्य केले. “वृक्ष संवर्धन -एक पाऊल शाश्वत विकासाकडे”या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून वृक्ष लागवड, व्यसनमुक्ती या विषयांवर जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. गावातील जिल्हा परिषद शाळेतील आवारातही परिसर सुशोभीकरणासाठी प्रयत्न केले गेले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्राच्या भावी नागरिकांना पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व मूल्य पटवून देत त्यांच्याकडून वृक्षारोपणसोबत आपले आरोग्य आपल्या हाती, बारावी नंतर काय? , आधुनिक जीवनशैली, नव्या युगाची नवी आव्हाने या अनेक विषयांवर मान्यवरांनी उद्बोधन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून खादी व ग्रामोद्योग शहादा तालुकाचे पर्यवेक्षक योगेश भदाने उपस्थित होते. मंडळामार्फत असलेल्या विविध योजनांमधून मिळणारा अनुदानांविषयीची माहिती, तरुणांसाठी व्यवसायाच्या संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचार करण्याची सवय अंगीकारली तर यश लवकर संपादन करता येते. कृती हीच यशाची गुरुकिल्ली आहे म्हणून कृतीवर भर द्या, असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती कल्पना पटेल यांनी केले. औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. पी.पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोहिनी पाटील, दिनेश पावरा, राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या नेतृत्व गुण विकास शिबिरासाठी निवड झालेला मनोज बाठया पाडवी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एम.के.पटेल, गावाचे सरपंच प्रकाश पवार, उपसरपंच सुरेखा पाटील, नवलपुर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आनंद मंगळे, जि. प.शाळा नवलपूरच्या मुख्याध्यापिका मंगलाबाई इलीस, ग्रामसेवक सुनील डी. पावरा, पोलीस पाटील रमेश सामुद्रे, राजू ठाकरे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.कल्पना पटेल,पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रंजना गावित, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. उर्मिला पावरा ,गणेश पाटील, विजेंद्र निकम व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उर्मिला पावरा यांनी केले. प्रा. रंजना गावित यांनी आभार मानले.








