नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील प्रसिध्द देवस्थान असलेल्या श्री दंडपाणेश्वर मंदिरातील गणेश मर्तीवरील ३० हजाराचे चांदीचे आभुषणे तसेच तीन दानपेट्या फोडुन त्यातील १२ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ अडाली आहे.दरम्यान पुखराज मोडमल जैन यांच्या फार्महाऊस मधील जैन मंदिरामधील दान पेटीतील १० हजार रूपये ही चोरट्यांनी लंपास केले असुन याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान चोरट्यांनी श्री.दंडपाणेश्वर मंदिरातील सिसिटिव्हीचा डीव्हीआर ही लंपास केल्याचे सांगीतले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नंदुरबार शहरातील प्रसिध्द देवस्थान म्हणुन श्री दंडपाणेश्वर मंदिर प्रसिध्द आहे. दि.८ जानेवारी रात्री १० ते ९ जानेवारी पहाटे ४.४१ वाजेदरम्यान अज्ञात चोरटयांनी श्री दंडपाणेश्वर मंदिरातील मुख्य गाभार्याच्या दरवाजाचे कुलूपाचा कडीचा कोयंडा तोडूत आत प्रवेश केला. मंदिरात असलेल्या गणेश मुर्तीचे दोन चांदीचे दात, चांदीची गणपतीची सोंडवरील नक्षदार कवच चांदीची छत्री दोन कानावरील कवच, दोन चांदीचे जास्वंदीचे फुल, चांदीचा मुकूट दोन चांदीचे गळयातील हार, एक चांदीचा ओम, त्रिशुल असा सुमारे १ ते सव्वा किलो वजनाचा असा एकूण ३० हजार तसेच तीन दानपेटया फोडून १२ हजार रूपये रोख रक्कम लंपास केली.
दरम्यान श्री दंडपाणेश्वर मंदिरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र चोरटयांनी मंदिरात परिसरात प्रवेश करताच आदी डीव्हीआर फोडला त्यानंतर दानपेटी तोडून रक्कम लंपास केली.
दरम्यान सीसीटिव्हीचे डिव्हीआरही लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर या चोरटयांनी आपला मोर्चा पुखराज जैन यांच्या फार्महाऊसकडे वळविला तेथे जैन मंदिरात असलेल्या दानपेटीतून १० हजार रूपये रोख लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरीची घटना कळताच पोलीस उपअधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेशषन शाखेचे किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी याठिकाणी पाहणी केली.
जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके रवाना करण्यात आली. याप्रकरणी चंद्रकांत प्रल्हाद चौधरी रा.जळकाबाजार (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत. दरम्यान मंगळी चतुर्थीच्या आदला दिवशीच प्रसिध्द असलेल्या श्री दंडपाणेश्वर मंदिरात चोरी झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.








