नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका पतंजली योग समितीतर्फे नववर्षा निमित्त सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला आहे. या सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्य बी. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील गिरीविहारवाडी सभागृहात दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेला शिबिराचा शुभारंभ झाला.दीप प्रज्वलन प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य बी. एस. पाटील,प्राचार्य डॉ. एन. डी. नांद्रे,प्राचार्य एन.डि. माळी,प्रशिक्षक वसंत पाटील,सौ. किरणताई राजपूत, अजयसिंग गिरासे उपस्थित होते.
सदर शिबिर 5 ते 30 जानेवारी पर्यंत दररोज सकाळी सहा ते सात या वेळेत होईल.या शिबिरात अनुभवी व तज्ञ योगशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.शिबिरात दररोज सूर्यनमस्कार, योगी जॉगिंग, दंड बैठका, सूक्ष्म व्यायाम, विविध व्याधींवर मात करण्यासाठी उपयुक्त अशी योगासने आणि प्राणायामचे शास्त्रशुद्ध पद्धतीने निशुल्क प्रशिक्षण दिले जाईल.तसेच शिबिरात अष्टांग योग, षटकर्म, पंचप्राण, पंचकोष, ध्यान, योगनिद्रा, अध्यात्म आणि आयुर्वेद बाबत सखोल माहिती देण्यात येणार आहे.शिबिर यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रत्येक सहभागी साधकास जिल्हा पतंजली योग समितीतर्फे प्रमाणपत्र मिळेल तसेच भविष्यात पतंजली योगपीठ हरिद्वारला योग शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा व स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवून योग शिक्षकाच्या भूमिकेतून इतरांना मार्गदर्शन करण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन नंदुरबार तालुका पतंजली योग समितीतर्फे करण्यात आले आहे.
शिबिर यशस्वीतेसाठी जिल्हा प्रभारी एन. डी. माळी,भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी नवनीत शिंदे,जिल्हा संघटन प्रमुख वसंत पाटील,तालुका प्रभारी अजयसिंह गिरासे,विनोद सैंदाणे, प्रमोद मराठे,किशोर भावसार, भास्कर रामोळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महादू हिरणवाळे,महिला प्रतिनिधी किरण राजपूत, निकिता ठक्कर, वृषाली पाटील आदिसह पतंजली योग समिती,भारत स्वाभिमान ,( न्यास)
महिला पतंजली योग समिती,युवा भारत, किसान सेवा संघ नंदुरबार जिल्हा .साधक परिश्रम घेत आहेत.