नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील बसस्थानक परिसरात अंगझडती घेतली असता ४० हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल चोरी केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा ते नंदुरबार बसमध्ये सुनिल हंसाराम साळुंखे (रा.रामनगर पिंपळनेर ता.साक्री) हे प्रवास करीत असतांना त्यांचा १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास झाला.
नंदुरबार बसस्थानक येथे आले असता बसमधील समीर उर्फ घुगरु शेख अजिज व शेख मोहम्मद सादीक (दोघे रा.लिंबायत नगर, सुरत) यांची अंगझडती घेतली असता सुनिल साळुंखे यांचा १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल मिळून आला. तसेच १० हजार रुपये किमतीचे प्रत्येकी तीन मोबाईल दुसऱ्या ठिकाणाहून चोरी केल्याचे दोघांनी सांगितले. त्यांच्याकडून ४० हजार रुपये किंमतीचे ४ मोबाईल जप्त करण्यात आले. याबाबत सुनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र जाधव करीत आहेत.








